मुकुंदवाडी येथील व्यावसायिक प्रकाश कसारे यांचा शेंद्रा औद्योगिक वसाहतीत त्यांच्या कंपनिसमोर चारचाकी वाहनात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला असून हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या गळ्यावर खुणा आढळल्याने हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच खरे कारण समोर येईल. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुकुंदवाडी येथील ४८ वर्षीय व्यावसायिक प्रकाश सळूबा कसारे यांची शेंद्रा औद्योगिक वसाहतीत येथे तुषार इंजिनिअरिंग नावाने कंपनी आहे. हि कंपनी मागील अनेकदिवसापासून बंद होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी ती कंपनी किरायाने दिली होती. आज सकाळी तेथून जाणाऱ्या नागरिकांना कसारे यांचा मृतदेह त्यांच्या एम एच २०, डी. एफ. ४१४१ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाच्या समोरील सीटवर दिसून आला. नागरिकांनी या बाबत पोलिसांना माहिती देताच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहहयक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत कार व परिसराची पाहणी केली व त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीच्या शवविच्छेदन गृहात पाठविला.
घातपाताचा संशय
मृतदेहाच्या मानेवर काही खुणा आढळून आल्याआहेत. या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्या नंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल अशी माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांजवार्ता ऑनलाईन शी बोलतांना दिली